जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी (स्टेट गेस्ट) दर्जा देऊन आमंत्रित केल्याने त्यांचे केवळ राज्याच्या आणि देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले राजकीय महत्त्व व स्थान अधोरेखित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना जपानकडून शासकीय अतिथी हा बहुमान मिळाला आहे. हा मान यापूर्वी देशाचे विद्यमान पंतप्रधान तथा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१३ मध्ये त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.फडणवीस हे २० ऑगस्टपासून पाच दिवस जपानच्या दौऱ्यावर जात असून तेथील विविध खात्यांचे मंत्री, उद्योगपती, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, जायका व अन्य वित्तसंस्थाच्या उच्चपदस्थांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे वेगळे आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या संधी, सवलती, पोषक वातावरण व राजकीय पाठबळ हे उद्योगांना आणि वित्तसंस्थांना आवश्यक असते. सर्वसाधारणपणे सोयीसवलती व अन्य निर्णय हे मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उच्चपदस्थ किंवा दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उद्योग मंत्र्यापेक्षा राज्यांचे मुख्य मंत्री सहभागी होत असतात. फडणवीस हे जपानमध्ये पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण व आरोग्यविषयक बाबी आणि कर्जउभारणीसाठीच्या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी भाजपचे महत्त्व सरकारमध्ये अधिक असल्याचे ओळखून आणि केंद्रातही भाजप सरकार असल्याने जपान सरकारने फडणवीस यांना आमंत्रित केले आहे. अर्थ, पायाभूत सुविधा, एमएमआरडीए, राज्य रस्ते महामंडळ, शिक्षण, आरोग्य आदी खाती शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहेत. त्यासंदर्भातील बाबींसाठी फडणवीस बैठका घेणार आहेत. संविधानातील तरतुदी पाहता उपमुख्यमंत्रीपदाला मुख्यमंत्र्यांइतके वेगळे अधिकार नाहीत, अन्य कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे आहेत. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांच्याकडे सध्या गृह, ऊर्जा, जलसंपदा, विधि व न्याय, राजशिष्टाचार अशी खाती आहेत. जपान दौऱ्यात त्यासंदर्भातील कोणतेही मुद्दे नाहीत. पण फडणवीस यांचे देश व राज्यपातळीवरील राजकीय महत्त्व ओळखून जपान सरकारने त्यांना शासकीय अतिथी दर्जा देऊन आमंत्रित केल्याने त्यांनी आपला अधिकार व स्थान दाखवून दिले आहे.
जपानमध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. तसेच विदेशी गुंतवणूकदारांसमवेत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी हा दौरा महत्त्वाचा समाजाला जातोय. विशेष म्हणजे सोनी, एनटीटी, समिटोमो यासारख्या नामवंत कंपन्यांसोबत फडणवीसांच्या बैठका घेतील.जपान दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो प्रकल्पांना भेटी देऊन कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहेत. दि. २० ते २५ ऑगस्ट असा फडणवीसांचा दौरा असणार आहे.
