सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण पुन्हा जनावरांनी लम्पी स्कीन आजाराची लागन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. लम्पी स्कीन निवारणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत 170 कोटी रुपये खर्च केल्याचे विखे पाटील म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढते आहे. शेतकर्यांनी, पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरु केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.
लम्पी निवारणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी शासन सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी असल्याचे विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि हर घर जल या योजनेत अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांसाठी जांभळाचे रोप भेट देण्यात आले आहे, प्रत्येकानं त्यांचे संगोपन करावे, असे आवाहनही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.
गोवंशातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची साथ चालू झाली आहे. लम्पी आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांमध्ये विविध लक्षणे आढळून येत आहेत. हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर 100 टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी ज्या जनावरांवर तत्काळ योग्य उपचार करून घेतला व चांगली काळजी घेतली आहे ती जनावरे बरी होत आहेत. सर्वसामान्यपणे रोगातून बरे होणाऱ्या जनावरात 80 टक्के सुश्रुषा अथवा निगा व 20 टक्के औषधोपचाराचा वाटा दिसून येत आहे. म्हणून पशुपालकांनी रोगी जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आपले पशुधन वाचवण्यासाठी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.
