बीडमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सध्या चालू असणाऱ्या टीका-टिप्पणीवरही विरोधकांकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात असताना त्यावरून आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना ईडीचाही उल्लेख केला आहे.
रात्री झोपेत असताना देखील ईडी म्हटलं तरी शरद पवार हे 1 किलोमीटर धावतात. त्यांनी तत्वज्ञान सांगू नये. ज्यांनी आयुष्यात केवळ आपल्या कुटुंबासाठीच राजरकारण केलं. तसेच त्यांनी उलथवून लावण्याची भाषा करू नये. त्यांनी अशी भाषा करावी ज्यांनी आपलं आयुष्य जनतेसाठी वेचलं आहे. असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच 15 ऑगस्टनिमित्ताने लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाषण करताना घराणेशाहीवर टीका केली होती. भ्रष्टाचार, घराणेशाही व वितुष्टीकरण या तीन अडचणी पार केल्याशिवाय देशात विकास अशक्य आहे, असं विधान मोदींनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपामध्ये असणाऱ्या राजकीय कुटुंबांचा मुद्दा उपस्थित करत मोदींना प्रत्युत्तर दिलं होतं. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
