जर तुम्ही समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत असाल किंवा प्रवासाचं नियोजन केलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. समृद्धी महामार्गावर आता कुणी रील्स काढले तर थेट तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे. महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून अनेक तरुण तरुणी फोटो आणि रील्स काढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढण्यासाठी आता मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाणार आहे.
समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहने ही सुसाट वेगात असतात. अशातच रस्त्यावरून कुणी आडवं गेल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. काहीवेळा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब समोर येताच वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ शूट केले तर कलम 341 नुसार, एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड तसेच कलम 283 नुसार, कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असं कृत्य केल्यास दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हजारावर अपघात होऊनही आणि दीडशेच्यावर जीव जाऊनही प्रशासनानं कठोर पावलं उचललेली नव्हती. पण आता प्रशासन सतर्क झालं असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
