राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना जामीन मंजूर

खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली आहे. याप्रकरणी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यांवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

सामनामध्ये राहुल शेवाळेंच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचा राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता. यावरून त्यांनी कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. सुनावणी दरम्यान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्धव ठाकरे यांना हजर राहण्यासाठी राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी विरोध केला होता. राहुल शेवाळे यांच्याशी फोनवर संवाद झाल्यानंतर आक्षेप मागे घेतला. यापुढील सुनावणीत उद्धव ठाकरे व्हिसीद्वारे हजर राहणार आहेत. दरम्यान, सुनावणी करताना संजय राऊत आणि उध्दव ठाकरेंना 15 हजारांच्या जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर होते. उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या वकीलांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. राहुल शेवाळे यांनी केलेले आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा कोर्टाने केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आरोप मान्य नसल्याचे म्हटले.सामना मुखपत्रामध्ये माझ्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापून आलाय, असा आरोप करत राहुल शेवाळे यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसून प्रकरण कोर्टात आहे. माझगाव कोर्टाच्या निर्णयामुळे तुर्तास उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा मिळालाय.

या पुढची सुनावणी ही 14 सप्टेंबर रोजी होणार असून त्या वेळीही या दोघांनाही हजेरी लावावी लागेल. उद्धव ठाकरे हे राज्यातील अतिमहत्त्वाचे व्यक्ती आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्यापासून सूट देण्यात आली आहे. पुढच्या सुनावणीवेळीही उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती लावतील.राहुल शेवाळे आणि संजय राऊत यांच्यातील वादाचा हा मुद्दा आहे. खासदार राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली होती. दुबईतील कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये राहुल शेवाळे यांची गुंतवणूक असल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला होता. यामुळे आपली बदनामी झाल्याचं सांगत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.