राज्याचे माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक त्या खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुंडे यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. या बाबतचा शासन आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. ही योजना फलोत्पादन विभागाची असली तरी ती कृषी विभाग राबवीत असतो.
राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून या अंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100 टक्के अनुदान देते. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून पीक आणि पशुधन याबरोबरच फळबागेच्या रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास आणि उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे हे उद्दीष्ट आहे.
