उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण समोर आले. ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्रावर उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च आल्याने हवाददिल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना फडणवीस यांनी धीर दिला. जपानच्या दौऱ्यावर असतानाही संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या.
पुण्यातील स्नेहल कुलकर्णी यांच्या एका नातेवाईकाला हृदय विकाराचा आजार उद्भवल्याने उपचारासाठी रुग्णालयाने सहा लाख रुपये हॉस्पिटल खर्च सांगितला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि त्यांच्या टीमशी संपर्क साधला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे पूर्वी काम पाहणारे ओमप्रकाश शेटे यांनी कुलकर्णी यांचा संपर्क सध्या काम करणारे मंगेश चिवटे यांच्याशी करून दिला. चिवटे यांनी सर्व कागदपत्रे घेऊन कुलकर्णी यांना मुंबईला बोलावले. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून संबंधित रुग्णाविषयी अपडेट देण्यास सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर रुग्णांना मदत करण्याच्या संकल्पनेतूनच ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ निर्माण केला होता. लाखो व्यक्तींना जवळपास दीड हजार कोटी रुपयांची वैद्यकीय मदत झाली आहे. परदेशात असताना देखील कुठल्या तरी अनोळखी रुग्णाबद्दल आस्थेने चौकशी करणे असो हे त्यांचं कृतज्ञ रहावं इतकं मोठं काम आहे, असे म्हणत तुषार दामगुडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
