राज्य सरकारमधील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा बैठका अजित पवार घेत असल्याचं समोर आलं होतं. त्यावरून देखील शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. आता यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक विभागाची माहिती घेण्याचा, बैठक घेण्याचा आणि योग्य रीतीने निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यात काहीही चूक नाही.
आमच्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीमधील तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टी एकमेकांशी संवाद करून आम्ही निर्णय घेत असतो. यात उगाच वादावादी लावायचा प्रयत्न कुणी करत असतील तर ते चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खूप चांगली प्रगती झाली आहे, सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असे म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही, मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर त्यांच्यासह इतर अनेकांचा डोळा आहे. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पन्न होतो. कांदा हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण, नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कांदाचे उत्पादन शेतकरी घेत असतात. सरकारने कांदा निर्यात दर वाढवला तरी दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे, आज एक्स्पोर्ट करताना भाव मिळत नाही, त्यामुळे ऐतिहासिक भाव देण्याचा प्रयत्न केला. गरज वाटल्यास जास्त कांदा खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेवर पटेल म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असं ते म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचं नाही, सगळ्यांना शुभेच्छा.
