एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिंदे यांनी आपल्या समर्थकांना घेऊन गुवाहाटी गाठली. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंड मोडून काढण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. त्यात विधिमंडळ पक्षनेते आणि मुख्य प्रतोद बदलले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यावर निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा असे न्यायालयाने सांगितले आहे. १६ आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे.
कॉमनवेल्थ पार्लयामेंट्री एसोसिएशनची ९वी सभा ही उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतातील सर्व पीठासीन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विधीमंडळात एक वेगळी राजशिष्टाचाराची शाखा निर्माण करण्यात यावी आणि प्रत्येक विधीमंडळाला शासनाकडून निधीची तरतूद सीपीएच्या कामाकरिता उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी मागणी मी केल्याचं नार्वेकर म्हणाले. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सकारात्मक भुमिका घेतल्याचं ते म्हणाले.
आमदार अपात्रेवर नार्वेकर म्हणाले की, आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार आहोत. दरम्यान अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, अस आश्वासनही नार्वेकर यांनी दिलं.
“सर्व भारतवासीयांना अभिमान वाटेल अशी ही चांद्रयान ३ मोहिम भारताने हाती घेतलं आहे. काही तासातच चांद्रयानची अंतिम कार्यवाही होईल. सगळेच आतुरतेने या यशाची वाट पाहत आहेत. मी देशवासीयांना यानिमित्त शुभेच्छा देतो. ही मोहिम यशस्वीपणे पार पाडून भारताला आणखी एक विक्रम करण्याची संधी प्राप्त होवो,” अशी भावना राहुल नार्वेकरांनी व्यक्त केली.
