राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र आता सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात येतील, असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहेत. मिरजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.भाजपच्या होकायंत्राचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया. असे सुचक वक्तव्य खासदार संजयकाका पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. संजय काका पाटील यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “जयंत पाटलांचा भाजपा प्रवेश होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. काही दिवसापूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला होता “जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. जयंत पाटील सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. त्यामुळे ते भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे.
