घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाहीत. घरात बसूनच पक्ष गेला. उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्यांचा दरारा आणि त्यांचे काम याचे आम्ही 30 वर्षाचे साक्षी आहोत. इतके लोक सोडून गेले. त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाहीत. तशी क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाही. पक्ष चालविण्यासाठी 24 तासातले 18 तास काम करावं लागतं. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार पाचच लोक दिसतील, असा दावाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावरही या वेळी टीका केली. शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे? हे सांगण्याची गरज नसल्याचे बावनकुळे म्हणाले. ओबीसी समाजाला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच न्याय मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्राची विश्वकर्मा योजना येत आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी ओबीसी मंत्रालय निर्माण करण्याचे सुचविले नाही? त्याचे कारण काय? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.
चंद्रशेखर बावनकुळे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मन परिवर्तन होणार असल्याचं स्पष्ट केलं. मला अजूनही वाटतं शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. मोदींच्या नेतृत्वातील इस्रोच्या टीमने चंद्रयान तीन यशस्वी केलं. त्याचप्रमाणे एक ना एक दिवस शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल. काळ काही गोष्टींचा निर्णय करत असतो. आम्हाला कधी एकनाथ शिंदे, अजित पवार आमच्या सोबत असतील असं वाटलं नव्हतं. काही काळानंतर माणसाचं मनपरिवर्तन होत असतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी आलेल्या नोटीसवर ते म्हणाले की, मी या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शेतकऱ्यांकडून वसुली करू नये शेतकरी अडचणीत आहेत हे सांगणार आहे. ज्यांनी बँकेत गैरव्यवहार केला त्यांच्याकडून तो पैसा वसूल करावा अशी मागणी करणार असल्याचही बावनकुळे यांनी म्हटलं.
