‘घमेंडिया’ नावाने मुंबईत डरपोकांचा मेळावा; आशिष शेलार यांची इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका

देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत संपन्न होत आहे. आज आणि उद्या (31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर) अशी दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीला 28 पक्षांचे नेते मुंबईत येत आहेत. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र भाजपातर्फे या बैठकीवर कडाडून टीका करण्यात आली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर निशाणा साधला असून उद्धव ठाकरे यांच्यावरही ट्विट करत टीकास्त्र सोडले आहे.

“मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे वृत्त दिले आहे. “पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे.. फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना..महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!” असं म्हणत घणाघात केला आहे.

ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला… ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या. अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे.एवढेच नव्हे तर ज्यांनी महाराष्ट्राचा द्वेष केला त्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांचे तोंड गोड केले जात आहे. पंगती बसू देत आणि जेवणावळीही उठू देत, फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना, या महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे! असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.