एलपीजीच्या घरगुती ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आता मोदी सरकारने व्यावसायिक सिलेंडर वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 157 रुपयांनी कमी होऊन आता 1522.50 रुपये झाली आहे. हे दर आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.दिल्लीत हे 1680 रुपयांऐवजी 1522.50 रुपयांना तर कोलकातामध्ये आजपासून 1802.50 रुपयांऐवजी 1636 रुपयांना मिळेल. तसेच मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1640.50 रुपये होती ती आता 1482 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1802 रुपयांवरून 1636 रुपयांवर घसरली आहे. याशिवाय मुंबईत त्याची किंमत आधी 1640 रुपये होती, जी 1482 रुपयांवर आली आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत 1852 रुपयांना मिळणारा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1695 रुपयांना मिळणार आहे.
अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल. दरम्यान, 33 कोटी ग्राहकांसाठी 200 रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली होती.जुलैपूर्वी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती यावर्षी मे आणि जूनमध्ये सलग दोनदा कमी करण्यात आल्या होत्या. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 172 रुपयांनी कमी केली होती. जूनमध्ये 83 रुपयांची घट करण्यात आली होती. याशिवाय या वर्षी एप्रिलमध्येही त्यांच्या किमती 91.50 रुपये प्रति युनिटनं कमी करण्यात आल्या होत्या.
