पाठ्यपुस्तके मराठीत करण्यासाठी विद्यापीठांना सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत

विविध अभ्यासक्रमांची इंग्रजी क्रमिक पुस्तके तत्काळ मराठीत भाषांतरित करण्यासाठी सर्व विद्यापीठांनी वेगाने पावले उचलावीत. राज्यातील सर्व विद्यापीठांनी येत्या पंधरा दिवसांत प्रत्येकी दहा क्रमिक पुस्तके मराठी भाषांतरित करावीत आणि सप्टेंबर अखेरपर्यंत अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके मराठी उपलब्ध करून द्यावीत, अशी ताकीद उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना दिली आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठांनी सर्व विद्याशाखेतील अभ्यासक्रमाची पुस्तके मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यापूर्वीच सूचना काढल्या आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग व आयआयटी मुंबई यांच्या दरम्यान उडान प्रकल्पांतर्गत इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तकांचे मराठी भाषेत भाषांतर करण्याबाबतचा करार ५ जानेवारी रोजी करण्यात आलेला आहे.या करारानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेतील सर्व इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तके आयआयटी मुंबई यांचेकडून भाषांतरीत करून घेण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील एकाही विद्यापीठाने इंग्रजी भाषेतील क्रमिक पुस्तकांचे भाषांतर करण्याची कार्यवाही आपल्या करण्यात आलेली नाही.

उच्च शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांच्या भाषांतरासाठी आयआयटी मुंबईसह सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता पाठ्यपुस्तकांच्या मराठी भाषांतराचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आयआयटी मुंबईच्या सहकार्याने प्रत्येक विद्यापीठाने पुढील दोन आठवड्यात वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील किमान दहा पुस्तकांचे भाषांतर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तर उर्वरित सर्व पुस्तके सप्टेंबर अखेरपर्यंत भाषांतरित करून घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.