राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिक हातची जाण्याची वेळ आली आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवावे, तर महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा आमदार अभिमन्यू पवार यांच्यासमोरच उद्रेक झाला.
प्रशासकीय इमारतीत बोलावलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पिक वाया जात असल्याच्या तक्रारी केल्या. हे ऐकून पवारांचाही पारा चढला आणि त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीतूनच फोन लावला. महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर पवारांनी हे पाऊल उचलले. याप्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा घरी पाठवेन, अशा इशारा देवेंद्र फडणवीसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांना सांगितली.
निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे अजून मनस्ताप करण्याची वेळ येत असल्याचे कळताच उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून चांगलाच दम भरत शेतकऱ्यांना जर कुठला अधिकारी अडचणीत आणत असेल तर त्याला निलंबित करेन. पाऊस नाही, पिके सुकून जात आहेत, शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न सतावत असतांना भविष्यातील उपाययोजना तर तुम्ही राबवाच पण तात्काळ उपाययोजना करून वीज वितरण सुरळीत सुरू करा. या कामांमध्ये जर कोणी हयगय करीत असेल तर तुम्हा सर्वांनाच मी घरी पाठवेन, असा दम फडणवीसांनी फोनवरून दिला.कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर संवेदनशील राहून शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा कसल्याही तक्रारी समोर आल्या तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना दिला.
