मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरावाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“जालन्यातील घटना खरोखर दुर्देवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्याठिकाणी असलेल्या उपोषणकर्त्यांशी बोललो होते. आमचा विविध प्रकारे संवाद सुरु होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे. तो एका दिवसात सुटणार नाही. तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत, अशाप्रकारे आम्ही त्यांची समजूत काढत होतो. पण ते ऐकत नव्हते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल, तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणं जरुरीचं आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलं होतं. पण त्यांनी तुम्ही उद्या या, असं सांगितलं. प्रशासन आज पुन्हा गेलं आणि विनंती केली. पण आज पोलिसांना घेरुन दगडफेक करण्यात आली. 12 पोलीस जखमी झाले. त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या दगडफेकीत जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. मग त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज मध्ये कोणीही गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्यात आली. जर लाठीचार्ज झाला नसता तर पोलिसांना खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागला असते.मी मुख्यमंत्री असताना तर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मग हे सर्वोच्च न्यायालयांमध्ये ते आरक्षण का टिकला नाही याची सर्वांना कल्पना आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः समिती तयार केलेली आहे ती त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि ज्या वेगवेगळ्या मागण्या आल्या त्यावर सुद्धा काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. म्हणून मला सर्वांना आवाहन करायचा आहे की मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर असल्यामुळे कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शरद पवारांनी यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनीही जशाच तसे उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, “कालपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही, असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांची आज अचनाक भूमिका बदलल्याची दिसून आली. ते म्हणू लागले सरकारने हे जाणीवपूर्वक केले का? सरकाराला एका समाजाबद्दल आकस आहे का? आता माझ्या त्यांनाच सवाल आहे, की त्यांनी मराठा समाजासाठी काय केले? किंवा त्या समाजाच्या आरक्षणासाठी काय केले? हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे”, असे थेट आव्हान फडणवीसांनी दिले.
शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झालं आणि त्याठिकणी ११३ गोवारी समाजाचे लोक मृत्युमुखी पडले. पवारसाहेब पाहायला देखील गेले नाहीत आणि राजीनामा देखील दिला नाही. त्यामुळे आता पवार साहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्याने ते नाराज, चिडलेले आणि व्यथित आहेत. त्यामुळे ते असे अरोप करत आहेत मी त्यांना उत्तर देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
