आगामी गणेशोत्सवासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीची नियमावली महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सन २०१९ मध्ये देण्यात आलेले उत्सव मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडपाच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अशा परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र, उत्सव मंडपाची उंची ४० फुटांपर्यंत ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारण्यासाठी मंडळांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थापत्य लेखापरीक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश मंडळांची उत्सवाची तयारी सुरू झाली असून, उत्सवासाठीच्या अटी आणि शर्ती महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
विशेष बाब म्हणजे, गणपती उत्सवासाठी घेण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी महापालिकेतर्फे कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान, परवाना दिलेल्या जागेची महापालिकेला आवश्यकता भासल्यास किंवा त्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास, उत्सव सुरु होण्याच्यापूर्वी परवाना रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
गणेशोत्सव साजरा करताना स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कळवण्यात आलेल्या सूचना, नियम अथवा आदेशांचे सर्व गणेश मंडळांना पालन करणे बंधनकारक राहणार असणार आहे. उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी 3 दिवसांच्या आत स्वखर्चाने संबंधित मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती आणि अन्य साहित्य रस्त्यांवरुन ताबडतोब हटवून घेणे तसेच रस्त्यावरील घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटमध्ये बुजवून मनपाची जागा सुस्थितीत करणे बंधनकारक राहिल.
अशा आहेत नियमावलीतील तरतुदी
- मागील वर्षांपासून पुढील ५ वर्षांसाठी उत्सव मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडपासाठी दिलेल्या परवानग्या ग्राह्य धरणार.
- ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा आहे, २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल केला जात असेल तर नवीन जागेवर सर्व परवानग्या घेणे आवश्यक.
- २०१९ च्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालय, पोलिस ठाण्याकडून या सर्व परवाने घेणे बंधनकारक राहील
- या परवान्यांसाठी महापालिकेतर्फे कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही.
- सर्व गणेश मंडळांनी २०१९ च्या किंवा नव्याने घेतलेल्या परवान्यांची प्रत मंडप, कमानींच्या दर्शनी भागावर प्लास्टिक कोटिंगमध्ये दर्शनी भागात लावावी.
- उत्सव मंडपाची उंची ४० फुटापेक्षा नसावी. ४० फुटापेक्षा उंच मंडप असेल तर अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे.
- मंडप, स्वागत कमानी उभारताना अग्निशमन, रुग्णवाहिका, प्रवासी बस जाण्यासाठी लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत, कमानीची उंची १८ फुटापेक्षा ठेवावी.
- आवश्यकतेनुसार स्वयंसेवक / सुरक्षारक्षक नेमावेत. शाडूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य द्या.
- संस्था,संघटना, मंडळांनी, नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे.
- उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी ३ दिवसांचे आत मांडव, देखावे, कमानी उतरवून घ्याव्यात, रस्त्यावरील साहित्य ताबडतोब हटवावे.
- रस्त्यावर घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रेटमध्ये बुजवून टाकणे बंधनकारक आहे.
- परवाना दिलेल्या जागेची महापालिकेला आवश्यकता भासल्यास किंवा त्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास परवाना उत्सव सुरु होण्याच्यापूर्वी रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला आहे.
- मांडव, कमानींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.
- ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी.
