संपूर्ण राज्य पावसाची प्रतीक्षा करत असताना भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, राज्यात 5 सप्टेंबरनंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये. सप्टेंबर सुरू होऊनही अद्याप राज्यातील काही धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठीचा पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पिके, जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोसमी पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत.
पुणे परिसरात पुढील 48 ते 72 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडात आजपासून पावसाचा यलो अलर्ट पुढील चार दिवस देण्यात आला आहे. शनिवारी कोल्हापूर, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यात पाऊस झाला. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाच ते सात सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, व गोव्यात तीन ते सात सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यताही आहे. हवामान विभागाचे पुणे येथील के. एस.होसाळीकर यांनी याबाबत ट्विटही केले आहे.
विदर्भातही येत्या 3-4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरपर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवला आहे.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नागपुरात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला.. यामुळे उकाड्याने त्रस्त नागपूरकरांना दिलासा मिळाला. मात्र या पावसाने पुरती दाणादाणही उडवली. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं कोसळली. तसंच काही ठिकाणी वीजही गायब झाली. दरम्यान हवामान विभागाने नागपुरात यलो अलर्ट दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झालं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळल्याने चंद्रपुरात पुन्हा एकदा गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात गेले 25 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. सोयाबीन, कापूस आणि धान पीक सुकत चाललं असताना, या पावसानं पिकांना जीवदान मिळालंय.
