शेतकरी नेते पाशा पटेलांना श्री. गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड जाहीर; तेलबियांचे उत्पादन वाढीस केलेल्या विशेष कार्याची दखल

राज्य कृषिमुल्ये आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी तेलबिया उत्पादन वाढीसह शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष कार्य केले. याची दखल घेत द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई, जीजीएन रिसर्च राजकोट/इंदुरुच्या सहकार्याने यावर्षीच्या श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्डसाठी त्यांची निवड केली आहे.

गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबईच्या 60 व्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत केंद्रीय भूृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सदर पुरस्कार पटेल यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची स्थापना तीन महत्वाच्या श्रेणींमध्ये उल्लेखीनय योगदानासाठी करण्यात आली. मानचिन्ह रोख 50,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तेलबिया उत्पादक शेतकर्‍यांना पाठिंबा देण्याच्या तुमच्या अतुलनीय समर्पण आणि तळमळ यामुळे पाशा पटेलांची ‘श्री गोविंदभाई मेमोरियल अवॉर्ड 2022-23’ करता निवड केल्याचे द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया मुंबईचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे. या पुरस्कार सोहळ्याकरता डॉ. भागवत कराड, केंद्रीय वित्त राज्यमंत्री, भारत सरकार यांच्यासह कृषी मंत्रालयाचे सचिवांची ही उपस्थिती राहणार आहे.

सोयाबीन मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे पीक. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम सातत्याने पाशा पटेल यांनी केलं आहे. सोयाबीनच्या बाजारपेठेत कायमच दराची चढउतार असते. सोयाबीन राखून ठेवा योग्य भाव आल्यानंतर विका हे मार्केटचं गणित सातत्यानं पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी हा सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय दर, देशातील दर आणि राज्यातल्या दरांवर लक्ष ठेवून असतात. यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी फायदाच होत गेला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार या विषयावर शेतकरी संघटना कायम आक्रमक होत आली आहे. मात्र पाशा पटेल यांनी सातत्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न दर यासंदर्भात विविध आंदोलन केली सोयाबीन परिषदा घेतल्या शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली. यामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ झाली सोयाबीनचे क्षेत्र वाढलं आणि शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पासून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.