जालन्यातील आंदोलनानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षणाचा मुद्दा एकदा तापला आहे. मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण आणि पोलिसांचा लाठीचार्ज यामुळे राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ढवळून निघालं आहे. सत्ताधारी – विरोधकांकडून आरोप – प्रत्यारोपांनी राळ उठवली जात आहे. एकीकडे आरक्षणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी मोठं विधान केलं आहे.
‘‘भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे’’, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले.
आरएसएसच्या कार्यालयात 2002पर्यंत तिरंगा फडकावण्यात येत नव्हाता, या प्रश्नावर भागवत म्हणाले, आरएसएसने नेहमी तिरंग्याचा सन्मान केला असून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकावला आहे. आरएसएस हा नेहमी तिरंग्याच्या सन्मानासाठी प्राण देण्यास देखील तयार आहे.‘‘आज जे लोक केंद्र सरकारच्या सेवेत मोठय़ा पदावर काम करत असले की, आपण त्यांची प्रतिष्ठा वाढली असे म्हणतो. मात्र, तिथेही आपल्याला छुपा जातीयवाद पाहायला मिळतो. आरक्षणाचा विषय तर्काच्या आधारावर आपण कधीच समजू शकणार नाही. हा तर्काचा विषय नसून, समानता मानण्याचा विषय आहे. आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांच्या गरजा पूर्ण झाल्याने त्यांनी आरक्षण सोडून देण्याबाबतही आवाज उठतो. मात्र, सामाजिक समानता आल्याशिवाय काहीही शक्य नाही. त्यामुळे आरक्षण कधीपर्यंत राहील, असा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांनी हा विचार करावा की, काही लोकांनी दोन हजार वर्षे अन्याय, त्रास सहन केला, मग आम्ही दोनशे वर्षे कष्ट भोगले तर काय बिघडणार आहे?’’, असे भागवत म्हणाले.
नागपुरातील श्री अग्रसेन छात्रावासात सरसंघचालकांनी बुधवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अखंड भारत कधी होणार, हा प्रश्न विद्यार्थ्याने विचारल्यावर भागवत म्हणाले, “अखंड भारत म्हणजे फक्त सीमा बदलणे नव्हे. तर भारतीय मानसिकता स्वीकारणे आहे. आपल्या पेक्षा वेगळा विचारसरणी असल्यामुळे देशाची फाळणी झाले, हे त्यामागचे कारण आहे. आता शेजारील अनेकांना तसे वाटू लागले आहे. एकदा त्यांनी आपली विचारसरणी स्वीकारली की, ज्यामध्ये कट्टरतेचा समावेश नसेल, त्यावेळी अखंड भारताची निर्मित होईल. यामुळे आताची पिढी वृद्ध होण्याच्या आधीच हे स्वप्न पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
