शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी कधी प्रयत्न केले? राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केलं? इतके वर्ष सत्तेत राहिलात, जाणता राजा म्हणून फिरत राहिला, मात्र आरक्षणासाठी कधी प्रयत्न केले आहेत का?, असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात उपस्थित केला.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी विखे पाटील आज सोलापुरात आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विखे पाटील म्हणाले की, शरद पवारांनी सांगावे की, आपण मराठा आरक्षणासाठी प्रयत्न कधी केले? त्यांनी मुख्यमंत्री असताना कधी प्रयत्न केले? केंद्रात मंत्री असताना प्रयत्न कधी केले? महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून कधी प्रयत्न केले? हे त्यांनी सांगावे. लोकांनाही ते कळू द्या असा टोलाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.वेगवेगळ्या संघटना प्रयत्न करत आहेत, एकत्रित येत प्रभाविपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी मराठा बांधवांना विनंती आहे, आंदोलनाची दखल घेतली आहे. न्यायालयाची प्रक्रिया सुरु आहे, आमचं आवाहन आहे, आंदोलन स्थगित करावं कुठलंही चुकीची पावलं उचलू नये, असं अवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

विरोधकांचा यासंदर्भात बोलण्याचा काही अधिकार नाही, हे आरक्षण घालवलं कोणी? उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते ना? तुमच्या सरकारचं अपयश आमच्यावर का फोडताय? मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी शरद पवारांनी कधी प्रयत्न केले? ही सर्व संधीसाधू आणि स्वार्थी लोकं आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत असेही विखे म्हणाले आहेत.मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्ट आहे. दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही समाजविनाशक मंडळी घुसलेली आहे. ते हे मराठा आंदोलन वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजबांधवांना माझी विनंती आहे की, सरकारची भूमिका ही प्रामाणिक आहे.असंही विखे पाटील म्हणाले.