सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून धनगर समाज आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठीच आज धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांना लक्ष्य केलं आहे. विखे पाटील यांनी भेट देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेत असतानाही त्यांच्यावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आपण या आंदोलकांना माफ केल्याचंही स्पष्ट केलं आहे.
या प्रकारासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “भंडारा हा पवित्र मानला जातो. या पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली. यांचे मला विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका असते. यामुळे त्यांनी काही वावगे केले असे मला वाटत नाही. कार्यकर्त्याला मारहाण झाली, या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, “अचानक हा सर्व प्रकार झाल्यामुळे अंगरक्षक आहे ते त्यांची जबाबदारी येते. कुठलाही गुन्हा दाखल करून नका किंवा कोणतीही कारवाई करू नका, अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.”
दरम्यान, तिथे सुरक्षारक्षक असूनही विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण का केली? अशी विचारणा केली असता त्यावर विखे पाटलांनी कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं. “ती कोणत्याही नेत्याची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या क्षणी तसं वाटल्यामुळे त्यांनी ती कृती केली. मी कार्यकर्त्यांना सांगेनच. पण घटनाच अशी होती की कार्यकर्त्यांकडून स्वाभाविक प्रतिक्रिया येणं साहजिक होतं”, असं विखे पाटील म्हणाले.
भंडारा उधळण्याच्या आणि आंदोलकांना मारहाण होण्याच्या एका घटनेमुळे भाजपवर काही परिणाम होणार नाही. मी निवेदन घेतलं नसतं, त्यांच्या भावनेचा आदर केला नसता आणि त्यांनी आंदोलन केलं असतं तर समजू शकलो असतो. पण मी निवेदन स्वीकारलं होतं. म्हणणं ऐकून घेत होतो. कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून मारहाण करण्याचा काही हेतू नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
