आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि देशातील एक महत्त्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे पहाटेच चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आळी आहे. टीडीपीनेच याबाबतची माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने ही कारवाई केली आहे. नायडू यांच्याविरोधात 2021मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशात खळबळ उडाली आहे. चंद्राबाबू यांच्या अटकेमुळे आंध्रातील राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंध्र प्रदेशातील स्किल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशनमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळं सीआयडीने चंद्राबाबू आणि त्यांचा मुलगा लोकेश याला अटक केली असून दोघांची चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 2021 साली याच प्रकरणात नायडू पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सीआयडीने कडक कारवाई करत नांदयाल येथून पहाटे तीन वाजेच्या सुमारास चंद्राबाबू नायडू यांना अटक केली आहे. याशिवाय गोदावरी जिल्ह्यातून त्यांचा मुलगा लोकेश यालाही अटक करण्यात आली आहे. आंध्राचे डीआयजी रघुरामी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा मुलगा नारा लोकेश याला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे. सध्या चंद्राबाबू नायडू नांदयाल दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली. या अटकेनंतर आंध्रप्रदेशचे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना प्रश्न केला की, या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न देता त्यांना अटक कशी केली जाऊ शकते? असं असलं तरी, अटक हा तपास प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असून, 24 तासांत रिमांड रिपोर्टमध्ये सर्व तपशील देण्यात येतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे.