आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यातच मराठा समाजाच्या मागणीनुसार कुणबी दाखले देण्याबाबतचा निर्णय हा विधी तसेच न्याय विभागाचे मत घेऊनच घेतला आहे. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे. या आरक्षण प्रश्नावर राज्य सरकार संवेदनशील आहे. आपण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच आता जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत या समाजाला इतर सर्व सोयी, सुविधा दिल्या जातील, अशी घोषणा शंभूराज देसाई यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यात ते पत्रकारांशी बोतल होते.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोचले आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते, अशी टीका त्यांनी केली.उद्धव ठाकरेंनी नगर दौऱ्यात शासन आपल्या दारी योजनेवरून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘दुष्काळाबाबत आमचे सरकार संवेदनशील असून, त्याला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन केलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमावर आक्षेप घेत टीका केली असून, त्यांचे वक्तव्य निराधार आहे.

उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक राज्य सरकारवर टीका करत असतात. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आमचा त्यामध्ये समावेश होता.प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण तेथील प्रश्न सोडवू, असं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी आमचं ऐकलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तळागाळापर्यंत पोहोचले आहे.त्याचबरोबर त्यांनी सरकारी योजना गावागावात पोहोचल्या आहे. आमच्या योजना आणि उपक्रमांकडे जनतेचं लक्ष आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आमच्यावर टीका करत आहे.