मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सूरू केलं आहे. आज उपोषणाचा १४ वा दिवस आहे. राज्य सरकार त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मात्र, त्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी कालपासून पाणी पिणं आणि औषधं घेणंही बंद केलं आहे. त्यांनी सलाईनही काढलं आहे.
याच पार्श्वभागूमीवर आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढण्यासाठी आणि मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे दाखले देण्याची मागणी करीत मनोज जरांगे गेल्या १३ दिवसांपासून जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मराठवाडय़ातील मराठा समाजाला वंशावळ आणि अन्य पुरावे असल्यास कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यानुसार या पुराव्यांच्या छाननीची कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वे ठरविण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. तसा शासन निर्णयही काढण्यात आला. मात्र सरकारचा हा निर्णय जरांगे यांनी फेटाळून लावत वंशावळीच्या आधारे नव्हे तर मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली आहे.
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघतोय का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
‘मी एक पाऊल मागे सरकत त्यांचा सन्मान केला. त्यांच्या ज्या त्रुटी आहेत, त्या पूर्ण करतो असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघत आहे. आमचं मत असं आहे की, २००४ सालचा शासन निर्णय लागू करा. त्यात आम्ही समाधानी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते आमची मागणी पूर्ण करतील, असेही मनोज जरांगे म्हणाले.
