सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं; खरं नसेल तर राजकारणातून निवृत्त होईन – उपमुख्यमंत्री अजित पवार

शरद पवारांनी सभा घेतलेल्या कोल्हापूरमध्येच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज उत्तर सभा घेतली. या सभेमधून अजित पवारांनी पुन्हा एकदा सत्तेत सहभागी व्हायचं कारण सांगितलं. विरोधकांकडून दबावामुळे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे, या आरोपांनाही अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.‘लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता, अडीच वर्षात आम्ही सरकारमध्ये काम करत असताना हाती घेतलेली जी कामं होती ती पूर्ण करण्याचा दबाव होता. आमदारांची स्थगिती मिळालेली कामं, स्थगिती उठण्याकरता दबाव होता. काय आमची चूक झाली? आमच्यावर दुसरा कोणताही दबाव नव्हता’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं, तेव्हा त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत आम्ही 52 आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. हे जर खरं नसेल तर राजकारणातून निवृत्त होईन, हे खरे असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असं आव्हानच अजित पवारांनी दिलं आहे.मी आणि माझे सर्व सहकारी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी. त्या कामाला आम्ही वाहून घेतले आहे. आम्ही सरकारमध्ये नव्हतो, त्यामुळे काही कामे करता येत नव्हती. तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळाली पाहिजे, फक्त भाषण करून कामं होत नाहीत. पैसे देण्यासाठी सत्तेत गेलो आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी आम्ही महायुतीमध्ये गेलो नाही. आम्ही कुणाच्या दबावाल भीक घालत नाही, आम्ही पण शेतकऱ्यांची मुल आहोत, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

अजित पवार म्हणाले की, कोल्हापूरचा सर्वंकष विकास करणे हे आमचे ध्येय आहे. सकारात्मक टीका करणाऱ्याचे मी स्वागत करतो. पण बीनकामाचे स्वागत करणे मला नको आहे. मी आणि माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी न्याय देण्याचा प्रयत्न करत राहू. उचललं जीभ लागली टाळूला हे आम्ही खपून घेणार नाही. युती, आघाडी या पलिकडे देखील राजकारण आहे. विचारांची लढाई ही विरोधाची लढाई होऊ नये, विरोधासाठी विरोध ही माझी पद्धत नाही, चांगल्या कामाचे कौतुक करणं हे माझे कर्तव्य आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती. ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्ज फेडलं त्यांना अनुदान मिळणं बाकी आहे. आजच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की तातडीनं यादी तयार करा, नियमामध्ये बसतात पण निधी आला नाही म्हणून जे शेतकरी राहिलेत त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचं काम करणार आहे. आम्ही याच्या करता सत्तेत गेलो आहे. विरोधी पक्षात असतो तर हे झालं असतं का? असा सवाल अजित पवार यांनी केला.