राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आरोप-प्रत्यारोप होत असताना या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर कार्य निर्णय होते हे पाहणे अगत्याचे असणार आहे. यादरम्यान बैठकीला जाण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण हा सामाजिक मुद्दा असून, त्याचे राजकारण करू नका असे आवाहन विरोधकांना केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. शासन कोणालाही फसवणार नाही, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना आधी त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध करणं गरजेचं आहे. हे आमचं पहिलं काम असेल आणि आम्ही त्याला प्राधान्य देत आहोत. त्यासाठी समर्पित समिती नेमण्यात आली आहे. या समितीमधील लोक काम करत आहेत. परंतु या कार्यवाहीला थोडा वेळ लागेल. यासंबंधी निर्णय घेण्यासाठी सरकारला थोडा अवधी दिला पाहिजे. थोडा वेळ द्यावा यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना विनंतीवजा आवाहन केलं आहे.
मराठा आरक्षम न्यायालयात टिकले नाही तर ही फसवणूक ठरेल. आणि राज्य सरकारला कोणालाही फसवण्याची इच्छा नाही. तात्पूरते काम करून उपयोग होणार नाही, जे करू ते कायदेशीर आणि समाजाला फायदा मिळेल असे करू असेही एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, कारण हा सामाजिक प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतरही समाज आहेत, जसे की ओबीसी आरक्षण असेल, त्यांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, हीच आमची भूमिका आहे. आम्ही देऊ त्या आरक्षणाला बाधा येता कामा नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आजची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सगळ्यांनी सूचना कराव्यात असं सांगितलं आहे.
