“उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका”; संभाजी भिडेंचे मनोज जरांगेंना आवाहन

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. त्यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची उपोषण स्थळी दाखल झाले आहेत.

संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही. शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठिशी आहे. जसं पाहिजे तसं, आरक्षण मिळालं पाहिजे” असं संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना म्हणाले. ते अंतरावाली सराटी येथे आले आहेत. “अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत. उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका” असं संभाजी भिडे म्हणाले.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जिवाचा आकांत करु. मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला आहे. हवं ते मिळवून देण्याची जबाबदारी मला द्यावी. सरकारमधील तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती संभाजी भिडे यांनी केली.

मनोज जरांगे यांनी चालवलेले उपोषण कौतुकास्पद आहे. आज ना उद्या याला यश नक्कीच येणार हे शंभर टक्के आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाहीत, असे संभाजी भिडे यांनी सांगितले. राजकारणी लोकांकडून आपल्याला हवे ते करुन घेण्याची जबाबदारी मनोज जरांगे यांनी घेतली आहे. हे उपोषण खूपच कौतुकास्पद असल्याचे संभाजी भिडे म्हणाले.दरम्यान संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमुळे माझ्या आंदोलनाला बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.