मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थळी पोहोचतात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले 17 दिवसांपासून सुरु असलेले उपोषण आता थांबणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. तसेच, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. त्याशिवाय, ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचं आहे.
“मी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आरक्षण घेणार आहे. मी तुम्हाला शब्द दिला आहे. तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सरकारच्या वतीने एक महिन्याच्या वेळ मागितल्याचा प्रस्ताव होता. तुम्ही दिलेल्या एक मताने मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय तीन दिवसांपूर्वी घेतला आहे. इथून पुढच्या काळातही मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या मतावर मी ठाम आहे. माझी राखरांगोळी झाली तरी मराठा समाजासोबत कधी गद्दारी करणार नाही,” असेही जरांगे पाटील म्हणाले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीश महाजन हे उपोषणस्थळी आंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या टीमसोबत आम्ही चर्चा केली आहे. आमच्यातील चर्चा समाधानकारक झाली आहे. राज्य सरकार अरक्षणाबाबत गंभीर आहे. आजच्या चर्चेनंतर जे मुद्दे समोर आले त्या मुद्द्यांवर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
