तुम्ही आजोबांच्या विचाराचे नाही राहू शकला तर मग; आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही टीकाही सहन करावी लागली. बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सरकारवर ताशेरे ओढले होते. दीड वर्ष महाराष्ट्र गद्दार गँगच्या भूलथापा ऐकतोय असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे यांना त्यांच्या आजोबांची म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली आहे. केशव उपाध्ये यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, आजोबांची पूर्ण हयात ज्यांचा विरोध करण्यात गेली, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी महाराष्ट्राला विचार दिला, त्यांच्या विचारांशी गद्दारी केली, तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचाराचे नाही राहू शकला, त्यामुळे महाराष्ट्राच्या विचाराचं सोडा. महाराष्ट्रातला एकही नागरिक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव आहे. शिंदे फडणवीसांना मोकळेणाने बोलता तरी येतंय. अडीच वर्षं न बोलता तुम्ही काय काय केलंय हे सगळ्यांनी बघितलंय. मोदींच्या नावाने मतं मागितली, आणि विचारांशी गद्दारी करून सत्ता हापापली. भ्रष्टाचार केला. महाराष्ट्र रसातळाला नेला. महाराष्ट्रात जनतेसमोर कोणत्या तोंडाने जाणार हे बघा. असे ट्वीट करत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून एक आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे.मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.