मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सरकारची कोंडी केलेली असताना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांना टार्गेट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. संजय राऊताच्या मालकानेच मराठ्यांचं आरक्षण घालवलं. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले हे त्रिवार सत्य आहे, असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक्सपर्ट कायदे तज्ज्ञ आहेत. त्यांनी कायदा शिकवलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणी कायदा शिकवण्याची गरज नाही. उशीर होत आहे म्हणत खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका करत होते. आज त्यांच्यासोबत जाऊन बसावं लागत आहे. आमचे सरकार २०२४ पर्यंत टिकणार आहे, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. नितेश राणे आज (ता. १४) नागपुरात दाखल झाले असता, पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत विचारले असता, रोहित पवार हे ‘सीनियर केजी’मध्ये आहेत. अद्याप ते शाळेतही पोहोचले नाहीत. त्यांना कंठ फुटलेला नाही. आत्ता कुठे ते अंड्याच्या बाहेर पडलेले आहेत.अगोदर अनुभव घ्यावा, प्रणिती शिंदे काय बोलल्या, त्यावर लक्ष घालावं. असं काही तरी बोलत फिरण्यापेक्षा थोडं कर्जतमध्ये लक्ष घालावं, जेणेकरून माजी आमदार ही पाटी लावण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.
राणे पुढे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच गेले आहे. ज्यावेळी संजय राऊत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी उपोषणस्थळी गेले होते तिथे त्यांना बोलू सुद्धा दिले नाही. त्यांच्या मुखपत्रात राऊतच्या मालकाच्या आदेशाने मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चाचे कार्टुनही छापले गेले होते. त्यामुळे या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार त्यांना राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलनाची भाषा होऊ लागली आहे, असे विचारले असता राणे म्हणाले, मराठा आरणक्षणसाह ओबीसी, धनगर आरक्षणाच्याबाबतीत आमचं सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये. सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
