मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जरांगे यांनी १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर व दोन सरकारी अधिकारी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. उत्तरादाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जरांगे पाटील यांचे उपोषण सोडल्याबद्दल आभार मानले. मात्र, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घडलेला एक किस्साही सांगितला. “मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाची दखल उच्च न्यायालयानेही घेतली आहे. त्यामुळे तुमचं आंदोलन सर्वांपर्यंत पोहोचलंय”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “मी परवा दिल्लीत गेलो होतो. तिथेही मला विचारण्यात आलं, ये मनोज जरांगे पाटील है कौन? मी म्हटलं सामान्य कार्यकर्ता है.. तर म्हणाले, उसने तो सबको हिला के रख दिया है”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगिताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

परवा जी पत्रकार परिषद झाली. त्यातला मागचा पुढचा भाग काढला आणि मधला तेवढाच व्हीडिओ दाखवला. आमचा माध्यमांवर विश्वास आहे. हा तर विश्वासघात झाला. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत येत होतो. आमची बैठक ही साडेबारा एकपर्यंत ही बैठक चालली. त्या बैठकीनंतर आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उत्तरं नको. मीही म्हणालो, प्रश्न उत्तरं नको आणि राजकीय वक्तव्यही नको. फक्त बैठकीत जे ठरलं आहे तितकंच बोलायचं आणि निघायचं, असं मी बोललो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

तसंच, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हीसुद्धा स्वस्थ बसणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले की, मी बाबाला मघाशी सांगितलं की तुमचं पोरंग भारी आहे. स्वत:साठी नाही समाजासाठी लढत आहे. मनोजला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहे. त्यानं वैयक्तिक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. जेव्हा भेटला तेव्हा मराठा आरक्षणाबद्दलच आग्रही भूमिका मांडली. मी मनोजला मनापासून शुभेच्छा देतो. त्याचं मनापासून अभिनंदनही करतो.

मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कटिबद्द आहे, कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार. जोपर्यंत आरक्षण मिलणार नाही तोपर्यंत आम्ही मनोज सारखं स्वस्थ बसणार नाही. मराठा समाज आणि सरकार काही वेगळं नाही. प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं, माझे बाबा गावाला असताना तयारी करत होते. तेही मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत असतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.