राज्यात बेकायदेशीर सरकार सत्तेत बसले आहे. या सरकारने घेतलेले निर्णय बेकायदेशीर आहे. या सरकारचा निकाल 40 तासातच लावायला हवा होता. सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्याबरोबर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल यायला पाहिजे होता, असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या हल्ल्याला शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रतापराव जाधव यांनी राऊत यांच्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घेत जोरदार टीका केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाज जाधव विरुद्ध राऊत असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सगळ्यात अगोदर संजय राऊतच बेकायदेशीर खासदार आहेत. ज्या 40 आमदार आणि अपक्ष आमदारांच्या बळावर तुम्ही खासदार झालात ते सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. संजय राऊत यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी आमदारांच्या भरवश्यावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. मगच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करावेत, असा जोरदार हल्ला खासदार प्रतापराव जाधव यांनी चढवला आहे. छ.संभाजीनगरमध्ये होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीचा खर्च शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरही जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्य मंत्री सक्षम आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैशाची कमतरता नाही. मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत या सरकारने केली. घोषणा करणारे सरकार हे उद्धव ठाकरेंचे सरकार होतं. नियमित कर्ज भरणाऱ्याना मदत करू, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. ते 50 हजार रुपये वाटण्याचं काम आमचे सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांच्या दुष्काळी दौऱ्यावरून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंचा शेतीचा आणि शेतकऱ्यांचा काय सबंध? त्यांच्या आयुष्यात त्याच्या पायाला कुठे काळ्या मातीचा चिखल लागलेला असेल असे मला वाटत नाही. केवळ स्टंटबाजी करण्यासाठी, लोकांवर आरोप करणेसाठी हे दौरे असून शेतकऱ्यांना फसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.
