छत्रपती संभाजीनगर येथे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्य सरकाकडून काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पोहचलेल्या फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. २०१६ मध्ये मराठवाड्यात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४९ हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली होती. या मंत्रीमंडळ बैठकीच्या निमित्ताने ठाकरे गटाने मागच्या घोषणांचे काय झाले? ते ही सांगा असे आव्हान देत टीका केली आहे.
यावर बैठकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर पलटवार करतांना तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का? असा सवाल केला आहे. आम्ही मंजुर केलेल्या योजनांचा मुडदा पाडण्याचे काम तुम्ही केले आणि आता वर आम्हालाच विचारता की मराठवाड्यासाठी तुम्ही काय केले? अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे गटाला सुनावले. चिकलठाणा विमानतळावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीसांनी वाॅटरग्रीड योजनेचा आवर्जून उल्लेख केला.
मागच्यावेळी मंत्रिमंडळाची जी बैठक संभाजीनगरमध्ये झाली होती त्या बैठकीत घेतलेल्या जवळपास सर्व निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. एखाद-दुसरा शेवटच्या टप्प्यात आहे, कारण त्यात काही अडचणी आहेत. याची माहिती आम्ही माध्यमांना देणार आहोत. जे लोकं मागच्या बैठकीत काय झालं? असं विचारत आहेत त्यांनी ते वाचून घ्यावं.असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मराठावाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडण्याचे काम ज्या सरकारने केले तेच लोक माराठवाड्याला काल दिले असा प्रश्न विचारत आहेत. जे दिले होते त्याचा मुडदा पाडण्याचे काम यांनी केले. यांना मराठवाड्याशी काही देणे घेणे नसून यांना केवळ राजकारण करायचे आहे. मराठवाड्याच्या हिताची बैठक होणार असेल तर, ती कशी हाणून पाडायची कसे निर्णय होणार नाहीत, कसा मराठवाडा मागे राहिल अशा प्रकारचा यांचा कावा असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
