सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्यांनी विध्वंस सुरू केला;डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावर – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी डाव्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी डाव्यांना भारतीय संस्कृतीचा दाखलाही दिला आहे. तसेच अमेरिकेतील तत्कालीन ट्रम्प सरकारचं एक उदाहरणही दिलं आहे. छोट्या मुलांच्या प्रायव्हेट पार्टबाबत विचारणं हा डाव्या विचारांचा परिणाम आहे, असा हल्लाच मोहन भागवत यांनी चढवला आहे.सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विनाश सुरू केला आहे. त्यामुळं जगाला डाव्यांच्या या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते.

“डाव्यांचं संकट किती गहिरं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या घरातल्या लहान मुलांशी चर्चा करा. त्यांना १ ते १० संख्या म्हणून दाखवायला सांगा. त्यांना विचारा तुम्हाला राम, कृष्ण यांच्याबाबत माहित आहे का? एकदा शेषाद्रीजी एका घरी गेले होते. संध्याकाळी त्या घरातून बाहेर पडत असताना त्या घरातल्या आजीने कृष्णाच्या मूर्तीपुढे उदबत्ती लावली. शेषाद्री थांबले, त्यांनीही मूर्तीला नमस्कार केला. त्यावेळी त्या घरातली लहान मुलगी बसून राहिली होती. तिने नमस्कार केला नाही, उठून उभीही राहिली नाही, त्यावर शेषाद्री तिला म्हणाले काय गं? कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार नाही केलास? त्यावर त्या मुलीने उत्तर दिलं तो आजीचा देव आहे. तुझा देव कोणता? तर तिचा देव तिला जो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवला जातो तो. तुम्हीच अंदाज करा मी करत नाही. हे आपल्या मुलांपर्यंत आलं. मी गुजरातच्या एका शाळेत गेलो होतो. तिथल्या एका शिक्षकाने मला किंडरगार्टन शाळेत लावलेला एक नियम दाखवला. केजी-2 चे मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टची माहिती आहे काय? याची माहिती काढण्यास शिक्षकांना सांगणारा हा नियम होता. पाहा डाव्यांचा विचार कुठेपर्यंत गेला आहे. डाव्यांच्या मदतीशिवाय अशी विचारणा करणं शक्यच नाही. अशा प्रकारचे हल्ले आपल्या संस्कृतीशी संबंधित सर्व गोष्टींवर होत आहे, असा दावा मोहन भागवत यांनी केला.

“आपण डावी वाळवी म्हणतो. पण डावे उजवेही आपलं नाही, हे सगळं तिकडून (पाश्चिमात्य देशांतून) आलेलं आहे. आजच्या घडीला लेफ्ट म्हणजेच डाव्यांनाही त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली आहे. मी का त्यांना डावं म्हणावं? डावं आणि उजवं काही नाही, हे सगळे अहंकारी लोक आहे. अमेरिकेच्या संस्कृतीला दुर्गंधी आणण्याचं काम त्यांनीच केलं. हे फक्त हिंदूंचे विरोधी नाहीत, तर जगातल्या सगळ्या मंगल विचार करणाऱ्यांचे विरोधी लोक आहेत.”

मोहन भागवत म्हणाले, दैवी आणि असुरी प्रवृत्तीतील लढाई जुनीच आहे. त्यातील पात्रं, रूप, शस्त्रे बदलली; मात्र, एकच प्रवृत्ती आहे. आजचा संघर्ष देव आणि असुरांमधील संघर्षाचेच आधुनिक रुप आहे. सत्य दडपून असत्यच सत्य असल्याचा भ्रम निर्माण करणं हे अस्त्र असुरी प्रवृत्तींनी आता देशाकडून कुटुंबांपर्यंत आणलं आहे. भारतीय संस्कृती आणि सनातन मूल्यांमध्ये डाव्यांच्या या संकटातून वाचवण्याची ताकद आहे. डाव्यांचा विमर्श खोडून काढण्यासाठी सत्य, करुणा, शुचिता आणि तेजस ही चार तत्त्वे अंगीकारावी लागतील, असंही भागवत म्हणाले.