संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. उद्यापासून हे अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत सुरू होणार आहे. त्यामुळे आज जुन्या संसद भवनातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नरसिंह राव, चंद्रशेखर, व्हीपी सिंग, अटलबिहारी वाजपेयी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधान आणि इतर नेत्यांचा मोदींनी गौरवाने उल्लेख केला. जुन्या संसदेतील ऐतिहासिक कामगिरी, ऐतिहासिक निर्णय आणि ऐतिहासिक क्षणांनाही मोदींनी उजाळा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांचा गौरवाने उल्लेख करत त्यांचं तोंडभरून कौतुक केलं.
“जुन्या संसदेत अनेक गोड आणि कडू आठवणी आहेत. जुन्या संसदेतून बाहेर पडणे हा भावनिक क्षण आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आजपासून संसदेचे विशेष आधिवेशन सुरू झाले आहे. हे आधिवेशन पाच दिवस असणार आहे. जुन्या संसदेत आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन संसदेत संसदेचे कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी जुन्या संसदेत भाषण करतान अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि संसदेतील काम करणाऱ्या पत्रकारांपासून ते काम करणाऱ्या सर्वांचे मोदींनी कौतुक केले आहे.
खासदार म्हणून या इमारतीत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा मी संसद भवनाच्या उंबरठ्यावर डोके टेकवले. लोकशाहीच्या या मंदिरात मी श्रद्धेने पाय ठेवला होता. तो क्षण माझ्यासाठी भावनांनी भरलेला होता. मी कल्पना करू शकत नाही, पण भारतीय लोकशाहीची ताकद इतकी आहे की, रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा मुलगा संसदेत पोहोचतो. देश माझा इतका सन्मान करेल, याची कल्पनाही केली नव्हती.असंही मोदी म्हणाले. आपण नव्या भवनात भलेही जाऊ पण जुनं संसद भवन देखील येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहिल. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णिम प्रवासाचा भाग आहे. भारताच्या रक्तात लोकशाहीचं सामर्थ्य कसं आहे याची आठवण या भवनापासून होत राहिलं. अमृत काळातील पहिली पहाट, राष्ट्राला नवा आत्मविश्वास, नवा प्रण, नवं सामर्थ्यानं भरणार आहे. चारी बाजूंनी आज भारतीयांची चर्चा होत आहे.
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. या कालावधीत चार विधेयके मांडली जाणार आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्नोत्तरे करण्यासाठी 9 मुद्द्यांची यादी तयार केली आहे. या अधिवेशनात I.N.D.I.A. विरोधी आघाडीचे 24 पक्ष सहभागी होणार आहेत.
