सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला. तर अनेकांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी आव्हानात्मक भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, सनातन धर्मावर बोलून स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना आव्हान आहे की, इतर धर्मावर म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती धर्मांवर बोलून दाखवा.
सनातन धर्म संपावा अथवा संपवून टाकू अशी विधानं जे लोक करतात, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी खडसावून सांगितलं आहे की, सनातन धर्म तर अबाधित राहणार परंतु ज्यांचे विचार सनातन धर्म संपवण्याचे आहेत, त्यांचे विचारच संपून जातील.सनातन धर्माविरोधी बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणं, यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोललं नाही पाहिजे. पण तुम्ही इतर धर्मावर बोलून दाखवा. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा गोंधळ निर्माण होतो. पण सनातन धर्माविरोधात अशाप्रकारे बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष माननं, यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही. पण त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील.”
मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये बीजेपीचंच सरकार येईल, असा विश्वासही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच, जनआशिर्वाद यात्रा आणि परिवर्तन यात्रा या दोन्ही यात्रांना भरघोस यश मिळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
