महाराष्ट्रासह पश्चिम भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी तुफान लोकप्रिय, देशाच्या सर्वच भागात वाढली लोकप्रियता

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह पश्चिम भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तुफान आहे.देशाच्या सर्वच भागात पंतप्रधानांची लोकप्रियता वाढली असल्याचे इंडियाबुल्स इप्सॉसने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.इंडियाबुल्स इप्सॉसने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे की देशातील 10 पैकी 6 लोकांना नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून खूप आवडतात. देशाच्या उत्तर भागातील 72 टक्के, पूर्व भागात 73 टक्के, पश्चिम भागात 80 टक्के आणि दक्षिण भागात 31 टक्के नागरिकांनी पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेवर मोहोर उमटवली आहे.

विशेष म्हणजे पश्चिम भारतामध्ये समावेश होणाऱ्या राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये मोदींची लोकप्रियता सर्वाधिक आहे.यातील राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता गेल्या नऊ वर्षांपासून दररोज नवनवीन उंची गाठत आहे. पुरुषांपेक्षा महिला पंतप्रधान मोदींच्या मोठ्या चाहत्या असल्याचे समोर आले आहे.अहवालानुसार, टियर-1 शहरातील 76 टक्के मतदारांनी त्यांना पसंत केले, तर टियर-2 शहरांमधील 64 टक्के मतदार आणि टियर-3 शहरातील 62 टक्के मतदारांनी पंतप्रधान मोदींना त्यांची पहिली पसंती असल्याचे सांगितले.

18-30 वयोगटातील 66 टक्के तरुणांना पंतप्रधान मोदींची कार्यशैली आवडली आहे. त्याचवेळी, 31-45 वयोगटातील 64 टक्के नागरिक आणि 45 वर्षावरील 64 टक्के नागरिक पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर खूश आहेत. पंतप्रधान मोदींच्या कामावर अधिक शिक्षित वर्गातील लोक जास्त खूश असल्याचेही या सर्वेक्षणात समोर आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचे हे आकडे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला निवडणूक फायदा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतील.
बदलते राजकीय वातावरण आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, पंतप्रधान मोदींची सतत लोकप्रियता हे दर्शवते की पुढील निवडणुकीत त्यांना कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागणार नाही, असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले.