शिंदे गट बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्यांच्याबरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व आमदार-खासदारांना हाताशी घेऊन उद्धव ठाकरे पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, कार्यकर्ते जोडणं व महाराष्ट्राच्या विविध भागांचे दौरे करणे या गोष्टी करत असताना नगर जिल्ह्यात ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते व माजी मंत्री बबनराव घोलप नाराज असल्याचं दिसून येत असून त्यावर खुद्द घोलप यांनीच खुलासा केला आहे.
पुढे बोलताना घोलप म्हणाले, मी शिवसेना सोडलेली नाही. मी आजही कार्यक्रमाला, मीटिंगला बोलवलं तर जातो. माझं म्हणणं एवढं आहे की, जे घडलं त्यावर मातोश्रीनं मला उत्तर द्यायचं आहे. मला एकतर पक्षातून काढून टाकावं किंवा स्वीकारायचं असेल, तर माझे दोष काय होता ते मला कळलं पाहिजे? असा खडा सवालही घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
बबनराव घोलप हे गेल्या दहा वर्षांपासून शिर्डीतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे एेनवेळी सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी घोलपांचा मुलगा योगेश घोलपही इच्छुक होते. आता पुन्हा 2024 साठी घोलप हे शिर्डीतून इच्छुक होते. त्यांनी तयारी सुरू केली होती. परंतु एेनवेळी उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतले आहे. तसेच त्यांनी उमेदवारीचा शब्दही देण्यात आला आहे. त्यामुळे घोलप ही नाराज झाले.
वाकचौरेंच्या प्रवेशाआधी आपल्याला उद्धव ठाकरेंनी शिर्डी मतदारसंघाचं काम पाहायची जबाबदारी दिली होती, असा दावा घोलप यांनी एका वृत्त वाहिनीशी
बोलताना केला आहे. “मलाही काही कळत नाहीये. सगळं व्यवस्थित असताना हे अचानक का घडलं? मी काही मागितलं नव्हतं. मला स्वत:हून उद्धव ठाकरेंनी बोलवून माझ्यावर जबाबदारी टाकली होती. तुम्ही शिर्डी मतदारसंघ सांभाळा असं ते म्हणाले होते. मी त्यांना हेही म्हटलं होतं की मला एक अडचण आहे आणि ती दूर होईल अशी अपेक्षा आहे. कारण उच्च न्यायालयात मी बाजू मांडतो आहे. तसं काही झालं नाही, तर माझा मुलगा योगेश आहे”, असं बबनराव घोलप म्हणाले.
