नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 46 वर गेली आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषध टंचाईमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशात आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ३७ जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली होती. या मृत्यूंचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे.या अहवालानुसार हे सर्व मृत्यू औषधांअभावी झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
भारती पवार म्हणाल्या, सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तिथं वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, याची परिस्थिती जाणून घेतली. 500 बेडचे हॉस्पिटल आहे. इथं औषधे आहेत की नाही याबाबत माहिती घेतली. इमर्जन्सी रुग्ण किती आहेत याचा आढावा घेतला, त्यानुसार आज 25 रुग्ण आहेत काल 40 होते. इथं आयसीयूचे 9 बेड होते, ते वाढवण्याची गरज होती. त्यानुसार कोरोनात या रुग्णालयाला पॅकेज देण्यात आलं होतं त्यानंतर ते आता 80 बेडचं होईल. यात काही टेक्निकल अडचणी आहेत.अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालक खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती प्राथमिक अहवालात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दुसरा सविस्तर अहवालही लवकर येईल, असेही त्यांनी सांगितले.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर राज्याचे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रुग्णालयाला भेट दिली होती. ‘‘या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तसंच वर्ग-3 व वर्ग-4ची पदे ऑक्टोबरअखेर भरली जातील, पायाभूत सुविधांसह अन्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
