2019 ला शरद पवार तपास संस्थांना घाबरले होते का? देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकांनंतर 2019 ला शरद पवार भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी चर्चा करत होते. त्यांच्या संमतीनेच सर्व आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या वेळी शरद पवार तपास संस्थांना घाबरले होते का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 2019 ला शरद पवार यांच्या सांगण्यावरुनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. असा दावाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवारच 2019च्या राजकीय खेळी मागे असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यातून स्पष्ट झालं आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.शरद पवार यांनी 2019मध्ये आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्याआधी 2017 लाही त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती. कोणत्या एजन्सीला घाबरून त्यांनी चर्चा केली होती? तेव्हा पवारसाहेब कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. मुख्यमंत्री पदासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील. आणि आगामी निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातच लढवणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.शरद पवार यांच्या मान्यतेनेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं आहे. पवार साहेबांशी चर्चा करून आम्ही सह्या करूनच आलो आहोत हेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आता सगळं गेल्यानंतर आरोप करणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.