शरद पवारांना धक्का; लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचं लोकसभेतून निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे या बाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. मात्र, त्या आधीच शरद पवार यांना आणखी धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हे लोकसभेतून पुन्हा अपात्र झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.एकाच वर्षात दोन वेळा अपात्र ठरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केरळ हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा सचिवालयाने फैजल यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीची लढाई सुरू होण्याआधी खासदारांच्या संख्येमध्ये शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मोहम्मद फैसल यांना 2009 मधल्या एका राजकीय खूनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. आधी सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती त्यावर हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली होती. नंतर या प्रकरणात पीडितांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवलं होतं.

न्यायमूर्ती एन. नागरेश म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेचे गुन्हेगारीकरण लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार फैजल आणि इतर तिघांच्या शिक्षेवर स्थगिती असणार आहे. ही स्थगिती अंतिम निकाल लागेपर्यंत कायम राहील. ११ जानेवारी २०२३ रोजी कावरत्ती सत्र न्यायालयानं फैजल आणि इतर तिघांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.तसेच जोपर्यंत उच्च न्यायालय निर्णय घेत नाही, तोपर्यंत त्यांची शिक्षा स्थगित राहील, असेही स्पष्ट केले होते.

मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. मोहम्मद फैजल हे 2014 मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभा खासदार म्हणून 16 व्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आले होते. 2014-2016 या कालावधीत ते परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.मोहम्मद फैजल 2019 मधील लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून पुन्हा निवडून आले.