महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या अध्यक्ष पदावर राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होते.फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या नियुक्तीवर महायुतीच्या नेत्यांचे एकमत झाले असून त्यानुसार सेठ यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली होती. सेठ अखिल भारतीय पोलीस सेवेतून नियत वयोमानानुसार डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. मात्र व्हीआरएस घेऊन ते ते नव्या पदावर रुजू होतील. सेठ यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी याआधी किशोरराजे निंबाळकर होते. ते बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर रजनीश सेठ यांनी अर्ज केला होता. त्यानंतर आज शासनाकडून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रजनीश सेठ यांचा 29 डिसेंबर 1963 रोजी जन्म झाला. ते 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती झाले. रजनीश सेठ यांचं शिक्षण हे बी ए ऑनर्स (एल एल बी) झालंय. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत.गृह विभागाचे प्रधान सचिव, राज्याच्या कायदा आणि सुव्यस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. तसेच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपद म्हणून देखील काम केलं. त्यांच्याकडे 2021 मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
दरम्यान, याआधी एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता. त्यामुळे आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससीचे सेवानिवृत्त अध्यक्ष किशोर राजे-निंबाळकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित करण्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले होते.
