देशात आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे. देशासह राज्यातूनही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हवामाना विभागाच्या अंदाजानुसार, देशात रविवारपर्यंत देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मात्र, तापमान वाढलं असून तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळणार आहे.
गेल्या दोन दिवसांत पुणे शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून उष्मा वाढला आहे. शुक्रवारी दुपारी रस्त्यावरून चालताना उन्हाचा तडाखा जाणवतो. रात्री थंडी जाणवते. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पहाटे शहरावर धुक्याची चादर कायम होती. दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस मुख्यत: निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान राहील. संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.महाराष्ट्रातील ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होईल.
जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, नवी दिल्ली, गुजरात या राज्यांमधून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेत आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेऊ शकतो. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
येत्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि पश्चिम भारताच्या काही भागात कोरडे हवामान राहण्याचा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे आयएमडीने म्हटलं आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्य तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशातील काही भाग समाविष्ट आहेत.
