संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नसल्याची टीका उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणीस यांनी शनिवारी संजय राऊतांवर पलटवार करताना केली. संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. तर ठाकरे गटाने यापूर्वीच रामराज्याच्या संकल्पना सोडून दिली, असे ते अकोल्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“राम मंदिर बांधल्यानं कुणी राम होत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर जनता उभारत आहे. भाजपाचं काम करण्याची पद्धत रावणासारखी आहे. रावणानं ज्यापद्धतीनं लोकांवर अत्याचार केले. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र आणि दिल्लीतले सरकार लोकांवर अत्याचार करत आहे. रावण कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचं सरकार आल्यावर रामराज्य निर्माण होणार आहे,” असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही. कारण, संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. लायकीचे नाहीत, याचा अर्थ ते काहीही बोलतात. काहीही बोलणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचं? पण, उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते, याचा मला आनंद आहे. रामराज्याची संकल्पना ठाकरेंच्या संघटनेनं आधीच सोडून दिली आहे.”

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य मंत्रिमंडळातील 9 भ्रष्ट मंत्री विस्तारानंतर मंत्रिमंडळात दिसणार नाहीत असा दावा केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाजप वडेट्टीवार चालवत नसल्याचे स्पष्ट केले. विजय वडेट्टीवार थोडीच आमचा पक्ष चालवतात. वडेट्टीवार यांना त्यांच्याच पक्षातून डच्चू मिळणार नाही याची काळजी घ्यावी.अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली. त्याचबरोबर फडणवीसांनी आमदार बच्चू कडु यांचं कौतुक केलं. अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने अकोला मध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.

संजय राऊत यांनी शनिवारी भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, राम मंदिर बांधल्यामुळे कुणी राम होत नाही. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर जनता बांधत आहे. भाजपचे काम करण्याची पद्धत रावणासारखी आहे.