राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि आता पक्ष व चिन्ह कोणत्या गटाला मिळणार याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांच्या पक्षाची स्थिती सध्या गंभीर आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षावर लक्ष केंद्रीत करावं, असा सल्ला बावनकुळे यांनी शरद पवारांना दिला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनाही त्यांचा पक्ष शोधावा लागत आहे ही स्थिती का झाली? असा प्रश्न बावनकुळेंनी केला ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, “तुमच्या हातात जेव्हा पक्ष किंवा सरकार असतं आणि सर्वांना डावलून एककल्लीपणे चालता. घरात असो की बाहेर जे मुख्य लोक असतात त्यांनी आपण करतो ते सर्व बरोबर म्हटलं तर मलाही बाहेर जायला फार वेळ लागणार नाही. अशी परिस्थिती येईल की, लोक मला हे योग्य नाही असं म्हणतील. त्यामुळे शरद पवार शीर्षस्थानी असताना अजित पवारांना असुरक्षित वाटत होतं. त्यांनी ती व्यक्तही केली आहे. त्यांच्यावर ही स्थिती ओढावली आहे आणि ही स्थिती गंभीर होत जाणार आहे.”
नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व सध्या जगात आपली छाप पाडतं आहे. अशात त्यांचं नेतृत्व सगळेच मान्य केलं आहे. अजित पवार आमच्यासोबत आले. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं. त्यांनी तसं जाहीर केलं. त्यांचं ते जाहीर सांगणं महत्वाचं आहे. बाकी चौकशा, कारवाया ज्या आधी झाल्या त्या होत राहतील. पण आज त्यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांनी समर्थन दिलं ते महत्वाचं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात लोकसभा प्रवास उपक्रम सुरू केला आहे. लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आमचा उपक्रम आहे. ‘संपर्क ते समर्थन’ असा आमचा प्रवास आहे. जनता आम्हाला समर्थन देत आहे. याचं समाधान आहे. आता शरद पवार आणि जयंत पाटील विकास कसा करणार आहेत. शेवटी विकासाच्या आणि चढाओढीच्या राजकारणात जो विकास करू शकतो त्याच्यामागे लोक उभे राहतात. जसजशी २०२४ निवडणूक येईल तसतसा अजित पवारांना पुन्हा पाठिंबा मिळेल,” असा दावा बावनकुळेंनी केला.
