10 वी, 12 वीची परीक्षा वर्षातून दोनदा देणं बंधनकारक नाही – केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला. त्यानंतर आता या बोर्ड परीक्षांबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबद्दल केद्रीय शिक्षा मंत्रींनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांनी ‘दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला वर्षातून दोनदा बसणे बंधनकारक असणार नाही’, असे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. ते पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि एकाच संधी असल्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा जेईई सारखंच वर्षातून दोन वेळा ( १०वी, १२ वी ) च्या परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. यामध्ये ते चांगले गुण मिळालेल्या परीक्षेचा पर्याय निवडू शकतात. मात्र, हे सर्व ऐच्छिक असून कोणतही बंधन नसणार आहे. कारण, विद्यार्थी आपलं वर्ष वाया गेलं, चांगलं गुण मिळवता आले असते या गोष्टीमुळे नेहमी तणावात असतात. त्यामुळे केवळ एका संधीच्या भीतीतून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की तो परीक्षा देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि या परीक्षेतील प्रगतीवर खुश असेल तर त्या विद्यार्थ्यांने पुढची परीक्षा दिली नाही तरी चालेल. काहीही अनिवार्य नसेल, असंही ते म्हणाले.

नवीन पिढीला 21 व्या शतकातील कार्यस्थळासाठी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालये एकत्रितपणे काम करत आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावहारिक दोन्ही कौशल्ये प्रदान करण्यासाठी समन्वय निर्माण करत आहोत, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले. आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालय प्रमुखामार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, परदेशी विद्यापीठांसाठी भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जात आहे. याबद्दल लवकरच अधिसूचित केले जाईल. ते म्हणाले की आम्ही आदर्श स्वरुपाचे बदल करणार आहोत, त्यामुळे सर्व शक्यता पडताळून आणि सर्व शंका दूर करून आम्ही पुढे जाऊ. ते पुढे म्हणाले, दोन आयआयटी आधीच परदेशात त्यांचे कॅम्पस स्थापन करण्याच्या पुढील टप्प्यात आहेत. ज्यांनी इच्छा व्यक्त केल्या आहेत अशा अनेक देशांशी चर्चा सुरू आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय त्यांच्याशी समन्वय साधत आहे.