पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आलीये. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.
जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने सांगितले. मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात पार पडतील. सर्व राज्यांतील सरकारांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. मध्यप्रदेशातील 230 जागांवर निवडणूक होणार आहे. तर राजस्थानमध्ये 200, तेलंगणात 119, छत्तीसगडमध्ये 90 आणि मिझोराममध्ये 40 जागांवर निवडणूक होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण 16.14 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 8.2 कोटी पुरुष आणि 7.8 कोटी महिला मतदार असतील. यावेळी 60.2 लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.पाच राज्यांमध्ये एकूण 1.77 लाख मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. 1.01 लाख मतदान केंद्रांमध्ये वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
2018 मध्ये राजस्थानमध्ये 7 डिसेंबर, मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर, तेलंगणात 7 डिसेंबर आणि मिझोराममध्ये 18 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. तर छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले. 11 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते.
मिझोराम – 7 नोव्हेंबर रोजी मतदान
छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान
मध्य प्रदेश – 17 नोव्हेंबर रोजी मतदान
राजस्थान – 23 नोव्हेंबर रोजी मतदान
तेलंगाणा – 30 नोव्हेंबर रोजी मतदान
पाच राज्यांचा निकाल – 3 डिसेंबर रोजी
