आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

लोकसभेत महायुतीचा जो ही उमेदवार असेल त्यांच्यामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही आमची भूमिका आहे. भविष्यात पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईन. निवडणुकीत पडणारी मतं ही पक्षाची ताकद असते. त्यामुळे कुणी काय भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता निवडणूक आयोगात लढाई सुरु झाली आहे. चिन्ह आणि पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईलच. पण, त्यावेळी अजित पवार यांना संघटनेच पद द्या, अशी मागणी मी केली होती असे अजितदादा गटाचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले.

वायबी सेंटर येथे पवार साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा आम्हाला देखील अश्रू अनावर झाले. परंतु, सारखं सारखं अश्रू आणून आमदार जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असं वाटत नाही. पवार साहेबांबरोबर आमच्या पण भावना आहेत. मात्र, आम्ही डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाहीत, असा टोला त्यांनी आमदार आव्हाड यांना लगावला.

माझ्याकडे पक्षाने ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील समन्वयक पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्यामागे राष्ट्रवादीची ताकद उभी करावी ही भूमिका असल्याचे स्पष्ट करत पक्ष भविष्यात जी जबाबदारी देईल ती मी घेईन, असे आनंद परांजपे म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेचे पद द्या अशी मागणी केली होती, हे सांगतानाच आता निवडणूक आयोगात लढाई सुरु झाली आहे. चिन्ह, पक्षाबाबत जी भूमिका घ्यायची ती भूमिका निवडणूक आयोग घेईल, असे आनंद परांजपे यांनी सांगितले.

मनसेचे नेते अविनाश जाधव यांचे नाटकी आंदोलन करायची आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे ही त्यांची सवय आणि स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे. आज ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. या टोल दरवाढीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील. या आंदोलनातून मात्र काही साध्य झाले नाही. हा ठाण्यापुरता विषय नाही तर मुंबईच्या एन्ट्री पाॅईंटसंदर्भातला प्रश्न आहे. त्यामुळे एमएच – 04 संदर्भात दिलासा दिला पाहिजे, अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे.