काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी कंत्राटी भरतीचे आदेश काढून युवकांची दिशाभूल केली. कंत्राटी पद्धतीच्या जीआरवर ते सही करतात. मात्र त्यांचीच सही त्यांना आठवत नाही. सरकार गेल्यानंतर नौटंकी करतात, आतापर्यंत अनेक माणसे राजकारणात बघितली मात्र उद्धव ठाकरे यांच्या सारखा खोटारडा माणूस मी कधी बघितला नाही, त्यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा राज्यभर उद्या सकाळी १० वाजता आंदोलन करणार असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.यावेळी बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे सारखा खोटारडा माणूस पहिला नाही. खर तर त्यांनी जनतेची नाक घासून माफी मागायला पाहिजे. फडणवीस यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे,शरद पवार यांच्या काळातील कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या वतीने शिंदे सरकारचे अभिनंदन करतो.
या निर्णयामुळे राज्यातील युवक त्रस्त झाले होते. मात्र निर्णय रद्द झाल्याने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. युवक याच निर्णयाची प्रतीक्षा करत.होते असे देखील बावनकुळे यांनी सांगितले आहे. अशा राज्यातील युवक या निर्णयाची प्रतीक्षा करत होते. या आंदोलनात मी स्वतः सहभागी होणार असून आम्ही सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही असे आंदोलन करणार असल्याचे बावनकुळे म्हणालेत.
